मुंबई, 6 डिसेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढला होता. पण सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत या आदेशाला स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका येतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.

अधिक वाचा  कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार (DCGI)ची परवानगी

नेमकं प्रकरण काय?

सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी समाजाला दिलेले नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वगळता राजकीय आरक्षणावर स्थगिती दिली होती. त्यानंतर ओबीसी नेत्यांकडून या गोष्टीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकार सक्रीय झालं होतं. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींचे आरक्षण टिकावे यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या सात महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. विशेष म्हणजे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने आज या अध्यादेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.