सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पहायला मिळाले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार, यावर बरेच दिवस खलबतं सुरु होती, अध्यक्षपदासाठी अनेकांनी फील्डिंग लावली होती, मात्र आज अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं

या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, प्रभाकर घार्गे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत निर्णय घेऊन अध्यक्षपदाच्या नावावर मोहर उठवण्यात आली.

अधिक वाचा  डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी; सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

शिवेंद्रराजे भोसलेंच्या नावाला विरोध

राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव- पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांच्या नावावर सहमती झाली. सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातल्या विरोधाची हवा पाहता, तसेच राष्ट्रवादीमधून असलेला विरोध लक्षात घेत शरद पवार यांचा नाईलाज झाल्याचं पाहायला मिळालं.

रामराजेंची खेळी

शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करुन दोघांच्या खांद्यावर पुढील जबाबदारी सोपवली होती. रामराजेंनी स्वत:ची खेळी खेळत शिवेंद्रराजेंची मनधरणी करत राष्ट्रवादीचाच संचालक अध्यक्ष बनवला. अध्यक्षपदासाठी नितीन जाधव पाटील आणि उपाध्यक्षपासाठी अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अधिक वाचा  स्वत:च्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना कराचा हजारो रुपयांचा भार

अध्यक्षपदाला विरोध का?

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील मुख्य नेत्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र शशिकांत शिंदेंचा जिल्हा बँकेतील पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांचा शिवेंद्रराजेंच्या नावाला झालेला विरोध हाच आमदार शिवेंद्रराजेंच्या अध्यक्षपदासाठी विरोध ठरला, अशीच चर्चा आता जिल्ह्यातील राजकीय गोटात होऊ लागली आहे.

सातारा जिल्हा बँकेचे निकाल काय

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.