पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आज, सोमवारी नवी दिल्लीत आगमन होणार आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये एके-२०३ असॉल्ट रायफल्सच्या निर्मितीसंदर्भातील ५ हजार १०० कोटींहून अधिक किंमतीच्या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. आपल्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये पुतीन पंतप्रधान मोदींना एस-४०० ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सुपूर्द करतील. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

या दौऱ्यामधील महत्वाच्या निर्णयांमध्ये एके-२०३ असॉल्ट रायफलचा कराराचा समावेश आहे. या रायफल्सचे उत्पादन रशियाच्या मदतीने उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील कोरवा येथील कारखान्यामध्ये केलं जाणार आहे. तसेच भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांमध्ये सुरु करण्यात आलेल्या कारखान्यामध्ये पाच लाखांहून अधिक रायफल्स निर्माण करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहे. या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सात वर्षांमध्ये या कारखान्याचे पूर्ण हस्तांतरण करुन तो भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चार डिसेंबर रोजीच केंद्र सरकारने एके-२०३ असॉल्ट रायफलच्या निर्मितीसंदर्भातील व्यवहाराला मंजूरी दिली.

अधिक वाचा  शिवकालीन श्रीक्षेत्र म्हस्वेश्र्वर खारावडे वज्रलेपविधी पुर्ण; 500 किलो शेंदूरलेपाचे जला विसर्जन पुन्हा मंदिर खुले

त्या दौऱ्यानिमित्ताने पुतिन हे गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एखाद्या देशाचा दौरा करत आहेत. भारत करत असलेली एक-४०० ची खरेदी म्हणजे ५ अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी व्यवहाराचा भाग आहे. एरवी अशा व्यवहारांसाठी अमेरिकेचे निर्बंध लागू होण्याचा धोका पत्करून भारत रशियाकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रसामुग्री खरेदी करत आहे. मात्र चीनला आटोक्यात ठेवण्याच्या आपल्या प्रयत्नांत भारतालाही सामील करून घेण्यास इच्छुक असलेली अमेरिका याकडे डोळेझाक करू शकते. एस-४०० प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची खरेदी हा ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या शस्त्रखरेदी व्यवहाराचा भाग आहे.

नाटोचा मित्रदेश असलेल्या तुर्कस्तानने अशाचप्रकारची खरेदी केल्यानंतर अमेरिकेने आपली आधुनिक एफ-३५ लढाऊ विमाने त्या देशाला विकण्यावर निर्बंध घातले होते.