नाशिक : व्यक्तीस्वातंत्र्य, लेखकाच्या स्वातंत्र्यावर केवळ शासन बंधने घालते, असा आपला समज असतो. पण, त्यात तथ्य नाही. कारण, शासनाविरोधात किमान न्यायालयात दाद मागता येते. परंतु, झुंडशाही एखादे नाटक बंद पाडते, पुस्तक जाळते आणि तुम्हाला बोलूही देत नाही. समाजात ही अशीच असहिष्णुता वाढत राहिली तर लेखकांच्या स्वातंत्र्यासह लोकशाहीही संपेल, अशा शब्दांत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी झुंडशाहीवर परखड भाष्य ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात चपळगावकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खा. श्रीनिवास पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, दादाराव गोरे उपस्थित होते.

अधिक वाचा  ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, कुणा-कुणाला संधी?

१९७५ मधील दुर्गाताई भागवत यांच्या एका भाषणाचा संदर्भ देऊन चपळगावकर यांनी या विषयावर भाष्य करताना मुक्त विचारस्वातंत्र्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक लेखकाच्या मनात स्वाभाविक उर्मी असते. सभोवताली अनुभवलेले लोकांना सांगावे, म्हणून तो लिहितो. लोकशाहीत लेखक, विचारवंत, प्राध्यापक आदींची स्वायत्त शक्ती जनमत तयार करते. सरकारला प्रसंगी चुकत असल्याचे सांगते. स्वातंत्र्याचे रक्षण करते. ही शक्ती सरकारशी संबंधित नसते. या शक्तीची गरज त्यांनी मांडली. लेखक जगापेक्षा मोठा आहे. पण, आम्ही जर सत्ता पाहिल्यावर विरघळू लागलो तर सरकारला चुका कशा सांगणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्याचा हुंकार अनेक कवींनी नाशिकमधून मांडला. या गावातून लेखक, विचारवंतांचा व नागरिकांच्या स्वातंत्र्याचा उदार समाज निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

चपळगावकर म्हणाले, राज्यघटनेने विचार करण्याचा आणि विचारांचा विकास करण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठी भाषा शिकवली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येते. आपल्या स्वत:च्या भाषेचा अधिक वापर केला पाहिजे. मराठी ही ज्ञानभाषा करावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे प्रयत्न होते. ही भाषा ज्ञान भाषा करायची असेल तर तिचा वापर वाढला पाहिजे. मराठी भाषा अधिक वाढविण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांचीही महत्वाची भूमिका असल्याचे चपळगावकर यांनी सांगितले.

अधिक वाचा  गळीत हंगामाला साडेचार महिनेच पूर्ण राज्यातील १२० कारखान्यांचा हंगाम बंद; अद्यापही ८७ ठिकाणी हंगाम सुरू

अभिव्यक्तीवर हल्ला निंदनीय : पवार

लोकशाहीत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वानाच आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारले आहे. हे स्वातंत्र्य असताना एखाद्या लेखकाने काही लिहिले तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. संमेलनस्थळी रविवारी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न झाला. ही बाब निंदनीय आणि महाराष्ट्राला अशोभनीय असल्याचे स्पष्ट करत पवार यांनी या घटनेचा निषेध केला.