पुणे : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदींचा पराभव करावयाचा असेल, तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. कॉंग्रेसला वगळून कोणी एकत्र येत असेल, तर ते मोदी यांना थेट मदत करण्यासारखे आहे. कॉंग्रेसशिवाय आघाडी करणे व्यावहारिक नाही,’’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

१९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला होता. त्याला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसच्यावतीने ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन केले. संभाजी उद्यानाच्या परिसरात ‘पंतप्रधान इंदिरा गांधी आणि १९७१चे युद्ध’ या विषयावर शहरातील चित्रकारांनी चित्र रेखाटले. या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

ते म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी या भाजपला विरोध असल्याचे सांगत आहे. परंतु, त्यापेक्षा कॉंग्रेसला त्या जास्त विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मोदींचा पराभव केला नाही, तर देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.’’

काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी नाही : राऊत

मुंबई : राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या विरोधात पण काँग्रेसला वगळून विरोधी पक्षाची आघाडी उभारली जात असेल तर शिवसेनेने या प्रयत्नांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या वेगळी आघाडी तयार करणे म्हणजे भाजपला मदत करण्यासारखे आहे. देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करायची असेल तर काँग्रेस वगळून ती होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसबरोबर असल्याची भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय

कोरोना आणि त्याआधी मोदी सरकारने अर्थव्यवस्था चुकीच्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधोगतीला लागली आहे. बांगलादेशापेक्षा भारताचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. दहशतवाद कमी झाला नसून परराष्ट्र धोरणात देखील अपयश आले आहे.

– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री