नवी दिल्ली : राज्यसभेत मागील अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी चालू हिवाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या १२ खासदारांपैकी शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी या कारवाईच्या निषेधार्थ संसद दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अँकरिंग) सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसभा आणि राज्यसभा दूरचित्रवाणी वाहिन्यांचे एकत्रीकरण करून संसद टीव्हीची स्थापना अलीकडेच करण्यात आली. या दरम्यानच्या काळात दोन्ही वाहिन्यांवर काम करणाऱ्या अनेक पत्रकारांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही राजीनामा द्यावा लागला. नव्या स्वरूपातील संसद वाहिनीवर, एखादे सभागृह स्थगित झाले असेल आणि दुसरे चालू असेल तर दोन्ही क्रमांकांवर कामकाज चालू असलेल्या सभागृहाचेच चित्रण दाखवले जाते. नव्या वाहिनीत अनेक खासदारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अँकरिंग करण्यासही वाव दिला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरुर तसेच चतुर्वेदी आदी खासदारांचा त्यात पुढाकार आहे. चतुर्वेदी या मेरी कहानी या कार्यक्रमाचे अँकरिंग करत होत्या.

अधिक वाचा  नाना पाटेकर यांनी केली अजित पवारांची प्रशंसा.. म्हणाले,

”अशोभनीय वर्तन” केल्याचा ठपका ठेवून आपल्याला निलंबित केले आणि आपले संसदीय ट्रॅक रेकॉर्ड खराब करण्याचा प्रयत्न केला गेला, अशी खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. अशा स्थितीत आपण अँकरिंगची जबाबदारी सांभाळू शकत नाही असे सांगून चतुर्वेदी त्यांनी म्हटले की जिथे मला माझ्या प्राथमिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. त्याच संस्थात्मक रचनेत दुसरी एखादी जबाबदारी यापुढे पार पाडण्याची तयारी माझी नाही. त्यामुळे मी अँकर पदाचा राजीनामा देत आहे. हा कार्यक्रम जेवढा माझ्या हृदयाच्या जवळ होता तेवढेच सध्याच्या परिस्थितीमुळे मला त्यापासून दूर जावे लागले याचे दुःख वाटते.

अधिक वाचा  एसटीमहामंडळ 'चालक'आणि वाहक म्हणून करणार यांचा वापर

राज्यसभेतून निलंबित केलेल्या १२ खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि माकपचा प्रत्येकी एक अशा सदस्यांचा समावेश आहे. हे निलंबन मागे घेतल्याशिवाय राज्यसभा कामकाजावर बहिष्कार मागे घेणार नाही अशी घोषणा विरोधी पक्षांनी केली होती. मात्र गुरुवार दुपारनंतर कामकाज सुरळीत चालू झाल्याचे मागच्या आठवड्यात दिसले होते.

आवाज दडपण्याचा प्रयत्न

आपले निलंबन मनमानी पद्धतीने केल्याचा ठपका ठेवत चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटले आहे की माझा आणि माझ्या पक्षाचा संसदेतील आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पदाची शपथ घेताना जी प्राथमिक जबाबदारी राज्यघटनेने माझ्यावर दिली त्यापासूनच मला वंचित ठेवण्यात आले. अशा स्थितीत संसद वाहिनीवरील कार्यक्रमाचे संचालन करण्यात करण्यास मी अनुत्सुक आहे.