कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनने देशाची चिंता वाढवली आहे. देशभरात २१ हून अधिक रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. यामुळे महाराष्ट्रात चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ७ जणांना नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे. यात पुणे शहरातील एकाचा तर पिंपरी चिंचवडमधील सहा जणांचा समावेश आहे.

नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला आणि तिच्यासह दोन मुली, तिचा भाऊ आणि दोन मुली अशा सहा कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे. पुणे, पिंपरीत मिळून सहा रुग्ण आढळल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना घाबरू नका, काळजी घेऊया असं आवाहन केलं आहे. त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात असल्याचं सांगितलं आहे.

अधिक वाचा  'बॉस माझी लाडाची', नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्या वतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. त्यातीलच फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले आहे. लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झालेल्या व्यक्तींची प्रकृती चांगली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही असंही मोहोळ यांनी सांगितलं.

अधिक वाचा  पुण्यात महसूल विभाग कोरोना काळातही मालामाल ; 21 हजार कोटींचा महसूल जमा

महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे असल्याचंही मोेहोळ म्हणाले.