आपले घर हे आपल्यासाठी जगातील सर्वात आवडती जागा असते. विचार करा की ही जागा जर पृथ्वीवरून नाहीशी झाली तर…? याची कल्पना करणेही किती वेदनादायी असते… नाही का! पृथ्वीवरील डझनभर बेटांसाठी, ही कल्पना नसून भविष्यातील वास्तव आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढल्याने या बेटांना आधीच तोटा सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे आता या बेटांवरील लोकांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे.

तुवालू हे बेट अशा बेटांपैकीच एक आहे. जे थेट हवामान बदलामुळे प्रभावित होते. एक बेट जे जगातील सर्वात प्रदूषित देशांना ग्रीन वायू उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन करीत आहे. आवाहनाव्यतिरिक्त हा देश काही करू शकत नाही. सर्वात वाईट काळासाठी देखील तयार आहे. हा देश पाण्याखाली जाणार आहे.

या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सायमन कॉफे यांनी COP26 मध्ये हवामान बदलाच्या मुद्द्यावर जगभरातील देशांच्या बैठकीत एक अतिशय भावनिक संदेश दिला. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या या शिखर परिषदेला जगभरातील नेते उपस्थित होते आणि हवामान बदलाच्या संकटावर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अधिक वाचा  अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भुमिकेवरुन भाजपकडून प्रतिक्रिया “एक अभिनेता म्हणून"....

या संदेशादरम्यान कॉफे गुडघाभर पाण्यात उभे होते. ते ज्या ठिकाणी उभे होते तो एके काळी कोरडा भाग होता. मात्र वातावरणातील बदलामुळे आता पूर आला आहे. आपल्या संदेशात, तुवालूचा संदर्भ देत, ते म्हणाले की आज तुवालू जिथे आहे. ते हवामान बदलाच्या संकटाच्या भयानक परिणामांचे लक्षण आहे. येणाऱ्या काळात ते अधिक गंभीर होत जाईल आणि जगातील इतर देशांनाही त्याचा फटका बसेल.

समुद्र पातळी, संभाव्य धोका
तुवालुमध्ये नऊ लहान बेटे आहेत. ते ऑस्ट्रेलिया आणि हवाईपासून सुमारे चार हजार किमी अंतरावर आहे. त्याचे जवळचे शेजारी किरिबाटी, सामोआ आणि फिजी आहेत.

तुवालू समुद्रसपाटीपासून उंच नाही. सर्वोच्च बिंदू समुद्रसपाटीपासून चार मीटर उंच आहे. हे 26 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. जिथे सुमारे 12000 लोक राहतात. तुवालू, किरिबाटी आणि मालदीव सारख्या इतर बेटांसारखे, प्रवाळ खडकांनी बनलेले आहे आणि त्यामुळे विशेषत: ग्लोबल वार्मिंगमुळे प्रभावित झाले आहे.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाला ऑफलाईन परीक्षा घेता येणार राज्य शासनाची मान्यता

कॉफे म्हणाले की, ”ते जिथे राहतात तिथे जमिनीचा पातळ थर आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजूला समुद्र दिसतो. एका बाजूला मोकळा समुद्र आणि एका बाजूला सरोवर. गेल्या काही वर्षांत समुद्राची पातळी वाढल्याने जमिनीचा काही भाग पाण्याखाली गेल्याचा अनुभव आम्हाला आला आहे.”

कोफे म्हणाले की, तुवालूला काही काळापासून तीव्र चक्रीवादळ तसेच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे प्रवाळ खडकांचे नुकसान झाले आहे. जे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आणि माशांच्या प्रजननासाठी महत्त्वाचे आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या

कॉफे म्हणाले की, काही ठिकाणी समुद्राचे पाणी भूगर्भात जात असून त्यामुळे जलचरांवर परिणाम होत आहे. साधारणपणे आपल्याला पावसाचे पिण्याचे पाणी मिळते. काही बेटांवर भूगर्भातील पाणी मिळवण्यासाठी विहिरीही खोदल्या जातात.

अधिक वाचा  नितेश राणेंच्या वाढल्या अडचणी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

पण आता काही ठिकाणी समुद्राचे पाणी मुरत असल्याने तेही शक्य नाही. अशा परिस्थितीत आता आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी फक्त पावसावर अवलंबून आहे.

शेतीवर परिणाम

जमिनीत खारे पाणी साचल्याने शेतीवरही परिणाम झाला आहे. लागवडीयोग्य जमीन निरुपयोगी झाली आहे. तुवालूच्या मर्यादित परिस्थितीत अन्न उत्पादनासाठी तैवान सरकार पथदर्शी प्रकल्पांतर्गत आर्थिक सहाय्य देत आहे यावरून याचे गांभीर्य लक्षात येते.

शास्त्रज्ञ काय म्हणतात
युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) ने यावर्षी 9 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की जागतिक समुद्र पातळी वाढीचा दर 1901 ते 2018 दरम्यान तिप्पट झाला आहे. जो सध्या वर्षाला 3.7 मि.मी आहे.

हवामान बदलाची सद्यस्थिती नाकारता येत नाही आणि जागतिक स्तरावर अद्याप कोणतीही ठोस पावले दिसून येत नाहीत, या सर्व परिस्थितीत तुवालू आणि तेथील लोक स्वतःसाठी भविष्यातील पर्याय शोधत आहेत.