सिंहगड रस्ता – सिंहगड रस्त्यासाठी असणारे आणि विकास आराखड्यात नमूद केलेले पर्यायी रस्ते केवळ कागदावरच राहिले असून, नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून नागरिकांच्या वेळेचा, इंधनाचा अपव्यय तर होतोच. परंतु सर्वाधिक म्हणजे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानादेखील प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करत महापालिकेने सिंहगड रस्त्याला उड्डाण पुलाचा घाट घातला आहे.

त्यासाठी मोठा गाजावाजा करत उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाले. रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी त्यांनी पूल दुमजली करण्याचा सल्ला महापालिकेस दिला. दरम्यान, नागरिकांमधून पर्यायी रस्ते आधी करा, मग उड्डाण पुलाचे काम करा, असा रेटा आहे. अर्थात याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.

विकास आराखड्यातील या पर्यायी रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करत ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणत उड्डाण पुलाचे काम रेटून नेण्याचा महापालिकेचा खटाटोप वाखाणण्याजोगा आहे. या पर्यायी रस्त्यांची कामे आधी पूर्ण करून नंतर प्रस्तावित उड्डाण पुलाचे काम सुरू केल्यास मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

अधिक वाचा  संक्रांतीनिमित्त १ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार

या पर्यायी रस्त्याची कामे रखडली

1) विठ्ठलवाडी ते वारजे नदीकाठचा सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र राष्ट्रीय हरित लवादाने हा रस्ता भराव टाकून करण्यास आक्षेप घेऊन तो पुलासारखा करण्याचे आदेश दिले होते. मात्र याकडे लक्ष न देता महापालिकेने या रस्त्याच्या कामास केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या रखडलेले आहे.

2) सनसिटी भाजी मंडई ते कर्वेनगर रस्ता हा रस्ता नदी काठापर्यंत तयार केला आहे, तसेच नदीकाठच्या पलीकडच्या बाजूसदेखील रस्ता आहे. यासाठी आवश्यक ती जमीन संबंधित जागामालकांनी दिलेली आहे. मात्र नदीवर सुमारे दीडशे मीटर लांबीचा पूल उभारण्याची गरज आहे. तो पूल उभारला तर थेट कर्वेनगरमध्ये जाता येणार आहे. सोबतच हा रस्ता शिवणे-खराडी रस्त्यालादेखील मिळणार आहे.

3) मल्हार हॉटेल ते बंद पाइपलाइन कालव्याशेजारील रस्ता गेल्या वीस वर्षांपासून रखडला आहे. या संपूर्ण रस्त्याची लांबी सुमारे आठशे मीटर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष दीडशे मीटर रस्ता उपलब्ध आहे. केवळ १०० मीटर रस्ता करणे बाकी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता झाला तर कालव्याच्या रस्त्याने आलेली वाहने माणिकबाग चौकाच्या अलीकडे अर्थात मॅक्डोनल्डच्या समोर येतील. त्यामुळे आनंदनगरच्या आणि माणिकबाग डीपी रस्ता चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल.

अधिक वाचा  शाळेत पोर नाही...चक्क गुरुजींच भिडले; शिक्षकाचा अंगठा मुख्याध्यापकाने चावला

4) माणिक बाग डीपी रस्ता (गोयल गंगा रस्ता) हा सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयापासून ते वीर शिवा काशिद चौक येथे सिंहगड रस्त्याला मिळतो. हा रस्ता इंडियन ह्यूम पाइप कंपनीच्या मागून सनसिटी रस्त्याला जोडला जातो. तो पुन्हा भाजी मंडईच्या रस्त्याने कर्वेनगरला जोडला जातो, तर त्याची दुसरी बाजू सिंहगड पोलिस ठाण्याच्या बाजूने जाऊन प्रयेजा सिटीमार्गे नांदेड सिटीकडे निघतो.

5) वडगाव फाटा ते जनता वसाहत ते सावरकर पुतळा असादेखील रस्ता आहे. २०२१७ या कालावधीत हा रस्ता विश्रांतीनगर-पर्यंत करण्यात आला. त्यानंतर मात्र पुढील रस्ता तयार झाला नाही. रोहन-कृतिका सोसायटीच्या पाठीमागेपर्यंत हा रस्ता तयार झाला आहे. परंतु पुढच्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

6) विठ्ठलवाडी – वारजे नदीकाठच्या रस्त्याला जोडण्यासाठी हिंगणे – विठ्ठलवाडी असा रस्ता तयार केला होता. तो हिंगणे चौकात सिंहगड रस्त्याला मिळतो. तेथे डांबरीकरणही झाले होते; मात्र आता तशी परिस्थिती अस्तित्वात नाही. केवळ राजाराम पूल ते वडगाव फन टाईम यादरम्यान हे पर्यायी रस्ते अस्तित्वात आहेत. जे उड्डाण पुलाचे काम पूर्वी होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुलाचे काम सुरू करून ते पूर्ण करणे सोयीचे होईल.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

विठ्ठलवाडी कमान ते जलपूजन असा नदीकाठचा रस्ता तात्पुरता तयार करून देण्यात यावा, त्यामुळे सनसिटी रस्त्याने बाहेर जाणारी वाहने थेट कमानीजवळ निघतील आणि आनंदनगर चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल.

– नागरिक, आनंदनगर

या भागात येण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आधी पर्यायी रस्ते उपलब्ध करा, मगच पुलाच्या कामाला सुरुवात करा. नाही तर सध्या वाहतुकीस लागणाऱ्या वेळेच्या किमान दुप्पट वेळ लागेल. यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागेल.

– नागरिक, आंनदनगर

येत्या मार्चपर्यंत वडगाव फन टाईम, विश्रांती नगर ते जनता वसाहत असा (बंद पाइपलाइन) कालव्याशेजारील रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

– अतुल कडू, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग