पुणे : शहरात कचरा संकलन करणाऱ्या ‘स्वच्छ सेवा संस्थे’च्या कचरा वेचकांना मदर बॅग, पादत्राणांचे जोड आणि स्कार्फ पुरविण्यासाठी ४७ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. गेल्याच आठवड्यात महापालिकेने स्वच्छ संस्थेला कचरा संकलनासाठी एका वर्षाची मुदत दिल्यानंतर लगेच हा विषय मंजूर करण्यात आला आहे.

शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी स्वच्छ संस्थेशी संबंधित कर्मचारी काम करतात. या संस्थेचा करार संपल्याने पुन्हा एकदा दीर्घ मुदतीचा करार करावा यासाठी स्वच्छ तर्फे प्रयत्न सुरू होते. करार करण्यास उशीर होत असल्याने याविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर झाला. पण किती वर्षासाठी स्वच्छला काम देण्यात आले हे स्पष्ट नव्हते. गेल्या आठवड्यात झालेल्या मुख्यसभेत स्वच्छ संस्थेला एका वर्षासाठी काम देण्याचा निर्णय झाला. एका वर्षाने पुन्हा सुमारे साडे तीन हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार असल्याने यास स्वच्छेने विरोध केला आहे. मात्र, हा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने साहित्य खरेदीचा प्रस्ताव समोर आणला.

अधिक वाचा  डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, “या निर्णयामुळे स्वच्छ सेवा संस्थेच्या कचरा वेचक कर्मचाऱ्यांना ८६ हजार ४०० मदर बॅग, ३ हजार ४०० पादत्राणांचे जोड आणि ७ हजार २ स्क्रार्फ उपलब्ध होणार आहेत. त्याचा उपयोग या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी होणार आहे.

बोपोडीत महापालिकेचे ११वी १२ वर्ग

पुणे महापालिकेच्या बोपोडी उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी आणि बारावीचे सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर महापालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग चालविण्यात येतील.

अधिक वाचा  कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

बावधन येथे ई-लर्निंग स्कूल

बावधन-कोथरूड क्षेत्रिक कार्यालयाच्या अंतर्गत बावधन खुर्द येथे ई-लर्निंग शाळेचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला.