पुणे : अफगाणिस्तानातील अस्थिर वातावरणामुळे रस्तामार्गे देशात अटारी सीमेवरून होणारी सुकामेव्याची आवक काही महिन्यांपासून ठप्प झाली होती. अफगाणिस्तानातील वातावरण काहीसे निवळल्यानंतर रस्तामार्गे पाकिस्तान, अटारी सीमेवरून सुकामेव्याची आवक सुरळीत झाली आहे. तसेच इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल झाली आहेत. अफगाणिस्तान, इराणमधून सुकामेवा तसेच सफरचंदाची आवक रस्तामार्गे भारतात होत असून एकंदर आवक पाहता तेथील वातावरण निवळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमधील अस्थिर वातावरणामुळे महिनाभरापूर्वी इराणी सफरचंद बोटीने मुंबईतील बंदरात पाठविण्यात येत होती. तेथून देशभरात ती सफरचंद विक्रीस पाठविली जात होती. अफगाणिस्तानमधील वातावरण निवळल्यानंतर इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे अटारी सीमेवरून वाहनांमधून इराणी सफरचंद उत्तर भारतातील बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बंदरात तसेच अटारी सीमेवरून इराणमधील सफरचंद सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येत असून आवक वाढल्याने गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत इराणमधील सफरचंदांचे दरही कमी झाले आहेत, असे पुण्याच्या शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंदांचे व्यापारी झेंडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणाची उद्या सुनावणी; आरक्षणाचा पेच सुटणार?

काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम पुढील महिनाभर सुरू राहणार असून किरकोळ बाजारात सध्या काश्मीरमधील सफरचंदाची विक्री प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दराने केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचा हंगाम संपला असून सध्या बाजारात इराण तसेच काश्मीरमधील सफरचंदे उपलब्ध आहेत, असे सफरचंदांचे व्यापारी सत्यजित झेंडे आणि कुमार झेंडे यांनी सांगितले.

वेगळे काय?

इराणी सफरचंद चकचकीत असतात. चकचकीतपणा येण्यासाठी मेणाचा (वॅक्स) वापर करण्यात येत नाही. कश्मीरमधील सफरचंदांप्रमाणे इराणी सफरचंद चवीला गोड आहेत. मात्र, या सफरचंदांच्या आतील भाग हिमाचल प्रदेशातील सफरचंदांप्रमाणे काहीसा कडक असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  एसटी महामंडळाचा खाजगी वाहतूकदारांना झटका ,नवा निर्णय काय?

जानेवारीपर्यंत आयात..

इराणमधील सफरचंदांचा हंगाम सुरू झाला असून किरकोळ बाजारात एक किलो इराणी सफरचंदाची विक्री प्रतवारीनुसार १३० ते १५० रुपयाने केली जात आहे.

अफगाणिस्तानातून अंजीर, जर्दाळू तसेच पाकिस्तानमधून खारीक भारतात विक्रीस पाठविण्यात येते. खजूर सौदी अरेबियातून विक्रीस पाठविण्यात येतो. बदाम, काजूसह, बेदाणे, अक्रोड, पिस्ता यासह सर्व सुकामेव्याची आवक सुरळीत होत असून दरही स्थिर आहेत.