पुणे: सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात दोन शेतकऱ्यांचे संसार उद्‍ध्वस्त झाले. पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे. नियम मोडून बांधण्यात आलेले धनदांडग्यांचे अलिशान बंगले, फार्महाउस, हॉटेल यांना सोडून गरीबांना कायदा दाखवला जात असल्याचा संताप संबंधित शेतकरी कुटुंबातील तरुण व महिलांनी व्यक्त केला आहे.

घेरा सिंहगड गट ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सांबरेवाडी येथे डोंगरात बबन मरगळे, धाकू मरगळे व इतर शेतकऱ्यांची वस्ती आहे. शासनाकडून अद्याप ये-जा करण्यासाठी रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. आजूबाजूला पूर्ण जंगल असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून मरगळे बंधूंनी घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, म्हणून लोकवस्तीजवळ जनावरांसाठी व राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. तेथे धान्य व इतर घरसामान ठेवले होते. आज पहाटे अंधाराच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने जेसीबीच्या साह्याने हे संसार उद्‍ध्वस्त केले.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

सामान घेऊन जा नाहीतर…

संपूर्ण निवारा भुईसपाट केल्यानंतर व घरातील भांड्यांची अक्षरशः मोडतोड केल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घरसामान, धान्य संध्याकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा दिला. साहित्य नेले नाही तर आम्ही सायंकाळी गाडी भरून घेऊन जाऊ, असेही मरगळे यांना सुनावले.

“सगळं उघड्यावर आलंय. छताच्या पत्र्यांची मोडतोड केलीच, पण घरातील भांडीही जेसीबीने फोडली. शेळ्या-गुरं आज बांधणार कुठं? सरकारी मदत मिळत नाही, आम्ही कष्टानी उभं केलेलं तोडताना आणि आमची लेकरं-बाळं उघड्यावर आणताना यांना काहीच कसं वाटत नाही.”

– गंगुबाई बबन मरगळे

 सांबरेवाडी, घेरा सिंहगड

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी

“परिसरात अनेक मोठे बंगले, हॉटेल, फार्महाऊस हे वन कायदे मोडून बांधण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना वन अधिकाऱ्यांना कशाची भीती वाटते? गरिबांना असे चिरडून कायदा दाखवताना अधिकारी दुटप्पी भूमिका का घेतात? आम्ही कसलेही पक्के बांधकाम केलेले नव्हते. आम्ही उलट झाडे लावून जगवली आहेत. अतिशय निर्दयीपणे आमच्या गोठ्याची व घरसामानाची नासधूस करण्यात आली.”

– ज्ञानेश्वर धाकू मरगळे, सांबरेवाडी

“संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती व त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. काही जीवनावश्यक साहित्य आम्ही बाजूला काढून ठेवले आहे. इतर अवैध अतिक्रमणांबाबत आमची शोधमोहीम सुरू आहे. योग्य पडताळणी करून कारवाई करण्यात येत आहे. जेथे वन कायद्यांचा भंग झाल्याचे आढळेल तेथे कारवाई होईल.”

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

– बाबासाहेब लटके, खानापूर वनपरिमंडळ अधिकारी