केळघर : 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाबला (Ajmal Kasab) जिवंत पकडणाऱ्या केडंबे (ता. जावळी) गावचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) यांच्या हौतात्म्याला आज 13 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा दगडदेखील न हलल्याने शासन हुतात्म्यांप्रती किती असंवेदनशील आहे, ते दिसून येत आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा ओंबळे यांचे स्मारक लालफितीत अडकले आहे.

26/11 च्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांनी केवळ हातातील लाठीच्या साह्याने कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणला होता. तुकाराम ओंबळे यांच्या हौतात्म्यानंतर राज्य सरकारने केडंबे या त्यांच्या मूळ गावी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. ग्रामस्थांनी स्मारकासाठी अडीच एकर जागादेखील उपलब्ध करून दिली आहे. ओंबळे यांच्या या अतुलनीय पराक्रमाचे स्मरण राहावे म्हणून राज्य सरकारने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे ओंबळे यांचे स्मारक उभारले आहे. तर मेढा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्या पाठपुराव्यातून पंचायत समिती कार्यालयात हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या नावाने स्वागत कमान उभारण्यात आली आहे.

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

ओंबळे यांचे असीम धैर्य युवा पिढीसमोर आदर्श ठरावे, म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, तब्बल १३ वर्षे उलटून गेली तरी स्मारकाचे काम पूर्ण न होऊ शकल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओंबळे यांच्या या पराक्रमाची दखल देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली होती. मात्र, या देशभक्ताचे स्मारक का रखडले आहे, याचे कोडे उलगडत नाही. निदान पुढील वर्षी येणाऱ्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या अगोदर स्मारकाचे काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांकडून व्‍यक्‍त होत आहे.
‘‘हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली आहे. स्मारकाची जागा हस्तांतरित झाली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागेल.’’

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

-सोपान टोम्पे, प्रांताधिकारी

‘‘देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या तुकाराम ओंबळे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी होणे आवश्यक होते. आमच्या वडिलांनी आपल्या बलिदानाने केडंबे गावाला जगाच्या नकाशावर पोचवले आहे. शासनाने लवकरात लवकर स्मारकाचे काम मार्गी लावून त्यांच्या पराक्रमाचा सन्मान करावा.’’

-वैशाली ओंबळे, हुतात्मा तुकाराम ओंबळे यांची कन्या