कोरेगाव : संपूर्ण सातारा जिल्ह्यात धगधगते राजकारण यावेळेस कोरेगाव तालुक्यात पाहावयास मिळाले. एकीकडे घराणेशाहीला विरोध, सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलणे आणि पाडापाडीचे राजकारण याला कंटाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच करेक्ट कार्यक्रम जिल्हा बँक निवडणुकीत करून दाखविला आहे.

जुन्या एस काँग्रेसचा फॅक्टर, राजकारणा पलीकडील मैत्री आणि आमदार महेश शिंदे यांचे अप्रतिम नियोजन व नेटवर्क या त्रिसूत्रीतून सुनील खत्री हे जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांची अनेक वर्षांची इच्छा ही करेक्ट कार्यक्रमातून पूर्ण झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर राजकारण करत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यात भक्कमपणे कार्यरत असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर काढण्याचे षडयंत्र जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच विरोधकांना ज्येष्ठ नेतेमंडळींनी अभूतपूर्व ताकद आणि रसद देऊन आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव घडवून आणला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आतच खासदार शरद पवार यांनी थेट विधान परिषद सदस्यत्व बहाल केल्याने शशिकांत शिंदे यांच्या नावापुढे पुन्हा आमदार हे पद लागले, हे अनेकांना न रुचणारे आणि पटणारे होते. त्यांनी खच्चीकरणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या मार्गाने सुरूच ठेवला होता.

अधिक वाचा  भ्रष्टाचारमुक्त अन् पारदर्शक राजकारणास आम आदमीच पर्याय ; कृष्णा गायकवाड यांचे पत्राद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

जिल्हा बँक निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी गटात राष्ट्रवादी विरोधी गटाचे सुनील खत्री हे विजयी झाले आहेत. त्यांना ४५ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव महाडिक यांनादेखील ४५ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीद्वारे खत्री यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद असताना देखील खत्री यांना मिळालेली ४५ मते ही त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली. त्यांचा हा विजय बँकेच्या निवडणुकीत मोठा मानला जात आहे. अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. खत्री यांना विजयी करून ज्येष्ठ नेतेमंडळींनी पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना सूचक इशारा दिला आहे.

अधिक वाचा  पतित पावन तर्फे अधिकाऱ्यास घेराव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोरेगाव तालुक्यात विकास सोसायटी गटात ७७ मते होती. या गटातून लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी होती. विद्यमान उपाध्यक्ष सुनील माने यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अरुण माने, किन्हईचे राजेंद्र भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतिलाल भोसले-पाटील हे इच्छुक होते. सुनील माने यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील स्वतः आग्रही होते. मात्र, बँकेच्या चेअरमनपदाच्या राजकारणाने सुनील माने यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. शिवाजीराव महाडिक यांना अनपेक्षितरीत्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय डावलून कोरेगावात उमेदवारीचे वाटप झाले, त्याचा फटकाही कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच बसला आहे.

अधिक वाचा  बिंधुमाधव ठाकरे दवाखान्यात मयत पास केंद्र सूरू करा- मनसे

आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका..

जिल्हा बँकेच्या राजकारणात कायम किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शशिकांत शिंदे यांना यंदा बँकेत प्रवेश करून द्यायचाच नाही, असा निर्धार नेतेमंडळींनी केला होता. त्याच हेतूने अनेक मंडळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत होती. त्यांनी कोरेगाव आणि जावळी तालुक्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली होती. कोरेगाव तालुक्यातून आमदार शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारी करायची आणि जावळीत त्यांच्या विरोधी कोणी उमेदवारी करायचे हे सर्व अगोदर ठरले होते. हे आजच्या निवडणूक निकालानंतर टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरू झालेल्या पराभवाची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही. जिल्हा बँक निवडणुकीत जावळी आणि कोरेगावातील पराभव हा आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका मानला जात आहे.