पुणे : अधिकार नसताना कुलमुख्यत्यार पत्र घेऊन ते मिळकतीचे खरेदी खत करुन ते खरे असल्याचे भासवून झोपडपट्टी पूनर्वसन कार्यालयात झोपडपट्टी पूनर्वसनाचा प्रस्ताव (एसआरए) दाखल करुन वारसदार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गोयल गंगा ग्रुपचे अतुल जयप्रकाश गोयल आणि अमित जयप्रकाश गोयल यांच्यासह चौघांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राहुल कैलास तिकोणे (वय ५०, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील मिळकतीबाबत ४ फेब्रुवारी २००६पासून आजपर्यंत घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गोयल यांच्याबरोबरच कैलास किसन तिकोणे आणि छबन फक्कडराव थोरवे (रा. तुळशीनगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांचाही मृत्यु झाला आहे.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल कैलास तिकोने आणि छबन थोरवे यांना बिबवेवाडी येथील मिळकतीचे कुलमुख्यत्यार पत्र करुन देण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी २००६ मध्ये गोयल गंगा ग्रुपचे अमित गोयल यांना या मिळकतीचे कुलमुख्यत्यार पत्र दिले.

अतुल व अमित गोयल यांनी या मिळकतीचे खरेदी खत करुन ते खरे असल्याचे भासविले. झोपडपट्टी पूनर्वसन कार्यालयात झोपडपट्टी पूनर्वसनाचा (एसआरए) प्रस्ताव दाखल केला. फिर्यादी व इतर वारसदारांची तसेच शासनाची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे तपास करीत आहेत.