मुंबई : खंडणी प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आलेले व गेल्या मे महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचा ठावठिकाणा अखेरीस लागला. आपण चंडीगडमध्ये असल्याचे त्यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीकडे स्पष्ट केले. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिले.

अधिक वाचा  शेवटची अंगारक विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; जाणून घ्या

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्यावर परमबीरसिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. त्यांच्याविरोधात अनेकदा समन्स बजावल्यानंतर मुंबईतील कोर्टाने गेल्या आठवड्यात त्यांना फरारी घोषित केले. त्यामुळे परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागली.

टेलिग्रामवर सक्रिय झाले पण…

शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

न्यायालयात काय घडलं?

परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील, असं सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावं, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

परमबीर सिंग देशातच आहेत. ते फरार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंग यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत, असा युक्तिवाद सिंग यांच्या वकिलांनी केला. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यास सिंग पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात हजर राहतील, असं सिंग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देत तपासाला सहकार्य करण्याची सूचना केली.