मुंबई : आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) नुकताच संपला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. यानंतर आता अवघ्या 5 महिन्यांनी आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 15 व्या पर्वातील सामने भारतात होणार की आणखी कुठे, याबाबतची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली आहे. कोरोनामुळे आयपीएलचा 14 व्या मोसमाचा दुसरा टप्पा हा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर यूएईत खेळवण्यात आला होता.

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात होणार आहे, अशी माहिती जय शाह यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या विजय सोहळ्यात द चॅम्पियन कॉल या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

जय शाह काय म्हणाले?

“चेपॉकमध्ये चेन्नईची मॅच पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकने वाट पाहत आहात, याची मला कल्पना आहे. याला आता फार कमी वेळ राहिलेला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात होणार आहे. तसेच नवे दोन संघ सहभागी होणार आहेत, त्यामुळे रोमांच आणखी वाढणार आहे”, अस शाह म्हणाले.

“तसेच 15 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे या ऑक्शनमध्ये काय कसं होतं, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे”, असंही शाह यांनी स्पष्ट केलं.

14 व्या मोसमात कोरोनाचा खोडा

आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं होतं. मात्र स्पर्धेदरम्यान बायोबबल असूनही कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे या मोसमात काही दिवसांचा खंड पडला होता. त्यामुळे उर्वरित सामन्याचं आयोजन हे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये यूएईत करण्यात आलं होतं.