मुंबई : दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान 6 चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपो मध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. यामुळे महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन परदेशातही होणार आहे.

दुबई येथे पार पडत असलेल्या वर्ल्ड एक्सपोमध्ये महाराष्ट्रातील कलाकरांना आपले कलागुण दाखविता येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कलाकरांचा समावेश राहणार आहे. दरम्यान, 5 दिवस होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.

अधिक वाचा  'पुष्कर' प्रकल्प नाते विश्वासाचे.. हे ब्रीदवाक्य सार्थकी लावेल; आ. पाटील

महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक एक्स्पोमध्ये

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीत, नाटक, लोककला, सिनेमा, सांस्कृतिक परंपरा याची झलक या एक्स्पो मध्ये दाखविण्यात येणार आहे. कडू गोड, तक तक,ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ चित्रपट,वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये 20 लोक कलाकार सहभागी होणार आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकरांना व्यासपीठ मिळालेले नव्हते. पण आता निर्बंध शिथील करण्यात आल्याने ही संधी कलाकरांना मिळणार आहे.

गोलमेज चर्चासत्रात महाराष्ट्रातील सुविधांची माहिती

एक्सपो दरम्यान, माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे महाराष्ट्रातील चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात, महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते, येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची माहिती देणार आहेत. शिवाय विचारांची देवाण-घेवाण आणि कार्यक्रमाच्या सादरीकरणाची माहितीही महाराष्ट्रातील कलाकरांना या माध्यमातून होणार आहे. पाच दिवस असलेल्या या कार्यक्रमात 20 लोक कलाकरांचा समावेश राज्यातून होणार आहे.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

राज्य नाट्यस्पर्धेलाही होणार सुरवात

गतवर्षी कोरोनामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालायमर्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये गतवर्षी खंड पडला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.