पुणे : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रही बनावट असल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला होता. या प्रकरणी आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, जात प्रमाणपत्राची पडताळणी आता सुरू करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी वानखेडेंविरोधात रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आदात जात पडताळणी समितीकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकऱणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केली आहे.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने राहुल डंबाळे यांना पत्र पाठवलं आहे. त्यात म्हटलंय, जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम या कार्यालयास आपले निवेदन प्राप्त झाले आहे. तसेच भारत सरकारने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात दाखल्याची “महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांचे पडताळणीचे विनियमन), अधिनियम 2000” आणि त्यानुसार तयार केलेल्या नियम 2012 नुसार चौकशीची कारव्यवाही करुन अहवाल सादर करणेबाबत या समिती कार्यालयास आदेशित केले आहे.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

या पत्रात पुढे म्हटलं, आपल्या द्वारे सादर केलेल्या निवेदनात आपण नमुद केले आहे की, “समीर वानखेडे (आय. आर. एस.) यांचे वडील यांनी समीर वानखेडे यांचे जन्माच्या अगोदर मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे कागदपत्रे उपलब्ध झालेली आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी देखील सदर दाखल्याचा लाभ घेण्यापूर्वी म्हणजेच सन 2006 साली मुस्लिम धर्म स्वीकरला असल्याबाबतची प्रथमदर्शनी कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत.” या पत्राद्वारे आपणास सुचित करण्यात येते की, या प्रकरणी आपल्याकडे असलेले संपूर्ण कागदपत्रे या कार्यालयास तातडीने उपलब्ध करुन द्यावीत जेणेकरुन समीर वानखेडे यांचे बाबतीत आपण दिलेल्या निवेदनाप्रमाणे कार्यवाही करणे शक्य होईल.

अधिक वाचा  ‘आरटीई’च्या प्रवेशांस पॅनकार्ड बंधनकारक

काय आहे मलिक यांचा आरोप?

समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे, असा गंभीर आरोपही नवाब मलिकांनी केला होता.