नवी दिल्ली : भारत लवकरच कोरोना लसीच्या तिसऱ्या डोससाठी धोरण तयार करू शकतो. या विषयावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मोठी बैठक होणार आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. देशात कोरोना लसीच्या तिसर्‍या डोसबाबत एक तज्ज्ञ गट धोरण तयार करण्यावर काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिला जातो. तर बूस्टर डोस निरोगी लोकांना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर काही महिन्यांनी दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे.

अधिक वाचा  सोन्याचे भाव महिना अखेरीस कडाडले; चांदीच्या दरात मात्र घसरणच

निरोगी लोकांसाठी, बूस्टर डोस नंतर सुरू केला जाऊ शकतो. गेल्या ऑक्टोबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पॅनेलने कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त डोसची शिफारस केली होती.

देशात पहिल्यांदाच कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांची संख्या एका डोस घेतलेल्यांपेक्षा जास्त झाली आहे. सध्या देशात 38 कोटी लोकांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. म्हणजेच त्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर आतापर्यंत 37.5 कोटी लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. आतापर्यंत देशात 115 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 75,57,24,081 पहिले डोस आणि 38,11,55,604 दुसरे डोस देण्यात आले आहेत.