नाशिक: राज्यभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: हिरारिने प्रयत्न करत आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत किमान प्रत्येक व्यक्तीला एकतरी डोस मिळावा यासाठी राज्य सरकार मोहिम चालवत आहे. कवच कुंडल मोहिमेतंर्गत राज्यातील प्रत्येक घरात जात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेनी दिली आहे.

त्यातच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राजेश टोपे यांना किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी लसीकरणाबाबत केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राजेश टोपे यांनी मी इंदुरीकर महाराजांना फोन केल्याचं सांगितले. लसीकरणाबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन करू असं विधान राजेश टोपेंनी केले. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या फोन केल्यानंतरही इंदुरीकर महाराज लस न घेण्यावर ठाम राहतात की, लसीकरणाबाबत त्यांचे मत परिवर्तन होतं हे पाहावं लागणार आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

तसेच इंदुरीकर महाराज उत्तमप्रकारे समाजाचं प्रबोधन करतात. त्यांच्या स्टाईलमधील किर्तनाला जास्त प्रतिसाद मिळतो. जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाबाबत जागरुकता आहे. लस घेणं हे आपलं कवच कुंडल आहे. लसीमुळे आपल्याला कोरोना होणार नाही असं नाही तर कोरोनाचं गंभीर रुप तयार होणार नाही. हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. वैज्ञानिक दृष्टीने या लसीकरणाला महत्त्व आहे. माझे आणि इंदुरीकर महाराजांचे चांगले संबंध आहेत. मी त्यांना समजावून सांगेन असं राजेश टोपेंनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

मन खंबीर ठेवणे हेच कोरोनावरचं औषध आहे. कोरोना झालेल्या माणसांना त्यांच्या घरच्यांनीच जास्त त्रास दिला. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी हिंडतो, मी लस घेतली नाही अन् घेणार नाही. काहीच होत नाही मग घ्यायची कशाला? असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.