मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं संकट आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यातल्या विविध भागात मंगळवारी रात्री पावसानं हजेरी लावली. यावेळी कोकण, सातारा आणि पुण्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. सातारा शहर परिसर, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात रात्री एक पासून पहाटे तीन वाजेपर्यंत म्हणजेच बऱ्यापैकी दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर रत्नागिरी, खेड येथेही मुसळधार पावसानं हजेरी लावली. दापोली, मंडणगडमध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूरमध्ये पावसानं हजेरी लावली.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

पुढच्या चार दिवसात मुसळधार पाऊस

पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

सध्या शेतीतील कापणीची कामं संपली आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक शेतकरी पांढरा कांदा, वाल, मूग आदी पिकांची लागवड करत आहेत. तसेच आंब्याला पालवी फुटण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा स्थितीत पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावला आहे. आंब्याची पालवी कुजून मोहोर येण्याची प्रक्रिया लांबवणीवर पडण्याची भिती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  देशात १२७.६१ कोटी लसमात्रा; निम्म्याहून अधिक प्रौढांचे लसीकरण

पुढील तीन-चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आकाशात विजा चमकत असताना, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.