पुणे : शहरातील एकूण लोकसंख्येमधील पात्र नागरिकांच्या संख्यानिहाय लसीकरणाची टक्केवारी १०० टक्के पूर्ण झाली असली तरी, आजही शहरात स्थायिक असलेल्या हजारो नागरिकांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत माहिती घेऊन लस घेण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. शहरात ८ नाव्हेंबरपासून ही जनजागृती मोहिम करण्यात आली आहे. यामध्ये आजपर्यंत १२ हजार ४५ घरांना भेटी दिल्या असता, या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एकूण व्यक्तींपैकी व १८ वर्षांपुढील ३ हजार ७२९ पात्र व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच ९ हजार ५८७ जणांचा लसीचा दुसरा डोस बाकी असल्याचे आढळून आले असून, यामध्ये काही जणांचा ८४ दिवसांचा निर्धारित काळ पूर्ण झाला असला तरी त्यांनी लस घेण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे दिसून आले आहे.

अधिक वाचा  DCGI कडे सिरमचा अर्ज प्रलंबित ; अनेक देशात 'बूस्टर डोस'ला सुरुवात

कोरोना संसर्गावर पूर्णपणे मात करण्याच्या टप्प्यावर पुणे शहर असताना, लस न घेणाऱ्यांची ही हजारोंमधील संख्या शहराच्या आरोग्यासाठी खेदाची बाब ठरत आहे. शहरात शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला असताना, लस न घेणाऱ्यांची संख्या पाहता पुणे शहराबाहेरील अनेकांनी शहरात येऊन लस घेतली असल्याचे स्पष्ट करीत आहे. यामुळे शहरातील घराघरात पोहचून लस घेतलेल्यांची माहिती संंकलित करून, त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे हे आरोग्य विभागासमोर आता मोठे आव्हान आहे.

महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या या मोहिमेत सध्या हडपसर व वारजे क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत लसीचा एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे या जनजागृती मोहिमेत दिसून आले आहे.

अधिक वाचा  ‘आरटीई’च्या प्रवेशांस पॅनकार्ड बंधनकारक

”शहरात ज्या भागात लसीकरण कमी झाले आहे, अशा ठिकाणी घरा-घरापर्यंत पोहचून प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेतली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना जवळच्या केंद्रांवर लस घेण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे असे लसीकरण अधिकारी महापालिका डॉ. सुर्यकांत देवकर यांनी सांगितले आहे.”