मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे हाताळणारे विशेष न्यायालयाचे न्यायधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ येथील केळापूर येथील न्यायालयात बदली करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने तेथील कार्यभार स्वीकारावा, असे उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलीबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे महानिबंधक एम. डब्ल्यू. चांदवानी यांची स्वाक्षरी असलेला न्या. सातभाई यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी उपलब्ध झाला. प्रशासकीय कारणास्तव हा आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. खासदार व आमदारविरोधातील फौजदारी खटल्यांच्या सुनावणीची विशेष जबाबदारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातभाई यांच्याकडे होती.

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

न्या. सातभाई यांनीच महाराष्ट्र सदन प्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबीय आणि अन्य आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. न्या. सातभाई यांच्यासमोर देशमुख यांची कोठडी, अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन, तर खडसे यांच्याविरोधातील भोसरी जमीन संपादन प्रकरणही सुनावणीसाठी होते. जुलै २०२१ मध्ये न्या. सातभाई यांच्याकडे खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी खटल्यांच्या सुनावणीची विशेष जबाबदारी आली होती. त्याआधी त्यांच्याकडे अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीची जबाबदारी होती.