मुंबई – रझा अकदामीबद्दल जो काही तपास करायचा असेल तो पोलीस करत आहेत. परंतु भाजपा नेते आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करताय? त्याचा फोटो माझ्याकडे आहे. पोलीस याचा तपास करेल. अमरावतीत कुठल्याही समुदायात दंगल घडली नाही. अमरावतीत माजी मंत्र्यांकडून २ तारखेच्या रात्री प्लॅनिंग रचण्यात आलं. काही तरुणांना पैसे देऊन दंगल भडकवण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अमरावतीत दंगल पेटवण्यासाठी दारु, पैसे वाटण्यात आले. त्यासाठी मुंबईतून पैशांचा पुरवठा करण्यात आला. ते पैसे लोकांना वाटण्यात आले. अमरावती शहरात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. पोलीस तपासात हे उघड झालं त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजपाचं दंगलीचं हत्यार बाहेर काढते. भाजपा दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण खेळत आहे. महाराष्ट्राची जनता भाजपाच्या या राजकारणाला कधीच स्वीकारणार नाही. अमरावतीबाहेर कुठेही हिंसाचार घडला नाही. समुदायात तेढ निर्माण करण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या जमिनीवर चालणार नाही असं त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘गांधी आणि गोडसेंमध्ये मी…’, भाजपा उमेदवाराच्या उत्तरावरुन मोठा वाद

तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रात येऊन येथील सरकार उखडून टाकू असं विधान करतात. परंतु कुठलंही सरकार लोकांमुळे आणि बहुमताने निवडून येते. परंतु सरकार उखडण्याची भाजपाची पद्धत ही आहे की, आमदारांना खरेदी करण्याचं काम, प्रलोभन दिले. हा सगळा खेळ गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशात पाहिला गेला परंतु हे महाराष्ट्रात चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधी नेत्यांवर दबाव टाकला जातो. पश्चिम बंगालमध्ये ज्यारितीने नेत्यांना घाबरवून भाजपात सामील करून घेतलं. पण निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा हे लोक टीएमसीत जात आहे.

महाराष्ट्रातही असेच राजकारण केले. शरद पवारांना नोटीस देण्याचं काम केले. महाराष्ट्र सरकार उखडून फेकण्याचं स्वप्न भाजपानं सोडावं. महाराष्ट्राच्या सरकारचं चुंबक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेशी जोडली आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष चालणार आहे. मागील काही दिवसांपासून NCB कारवाईचा भांडाफोड केला आहे. आम्हाला ईडी, सीबीआय, एनसीबी कुठल्याही यंत्रणेकडून घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही असा इशारा नवाब मलिकांनी दिला.