पुणे – करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू झाली. त्याचप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यापीठ व महाविद्यालयांमधील वसतिगृहे सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व वसतिगृहे लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा प्रशासनाने करोनामुळे महाविद्यालयांची वसतिगृह विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेतली होती. अजूनही काही वसतिगृह जिल्हा प्रशासनाकडेच आहेत. परिणामी दिवाळीपूर्वी काही दिवस आधी महाविद्यालये सुरू झाली, तरी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी दिवाळीनंतर महाविद्यालयात येऊन ऑफलाइन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यामधील सुमारे 60 महाविद्यालयांच्या वसतिगृहांचा आढावा घेतला. त्यातील बहुतांश वसतिगृह शैक्षणिक संस्थांकडे असल्याचे दिसून आले. दरम्यान, उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठ परिसरातील वसतिगृहांचा आढावा घेतला असून सर्व वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू करता येऊ शकतात. राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार वसतिगृह सुरू केले जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट केले.

अधिक वाचा  "अशा ठिकाणी कशाला जायचं?" फडणवीसांचा साहित्य संमेलनाला जायला नकार

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्थांकडे असणारी वसतिगृह सुरू करण्याच्या स्थितीत आहे. बहुतांश वसतिगृह संस्थांकडे आहेत. काही वसतिगृह महसूल विभागाकडे असून ती पुन्हा ताब्यात घेण्याच्या सूचना शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे.

– डॉ. किरणकुमार बोंदर, उच्च शिक्षण सहसंचालक, पुणे