अमरावती : भाजपच्या ‘अमरावती बंद’दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. बोंडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. शहरातील संचारबंदी कायम असून, इंटरनेट सेवाही ठप्प आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले. त्याची अमरावतीत हिंसक प्रतिक्रिया उमटल्यानंतर शनिवारी त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. या दरम्यानही हिंसाचार झाला. या प्रकरणात अनेक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांसह एकूण शंभराहून अधिक जणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यात बोंडे यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राधा कुरील, सभागृह नेते तुषार भारतीय, नगसेवक अजय सामदेकर, सुरेखा लुंगारे, संजय अग्रवाल यांचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  मुंबईच आर्थिक राजधानी राहणार कुणी कितीही स्वप्न पहा; नवाब मलिक हे म्हणाले

हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत शंभराहून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

नागरिकांचे हाल

अमरावती शहरात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सोमवारी दुपारी २ ते ४ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी संचारबंदी शिथिल करण्याचा आदेश काढण्यात आला, पण सर्व संपर्क यंत्रणा ठप्प असल्याने याबाबत दुकानदारांपर्यंत माहितीच पोहोचू शकली नाही.