नागपूर : अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तरीही आज भाजपकडून धंतोली ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यावरूनच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज ते नागपुरात बोलत होते.

त्रिपुरा येथील कथित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्याचाच निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटनांनी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. त्यामुळे अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशानुसार पाच जणांना एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र, भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज धंतोली ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आम्ही जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही, असं बावनकुळे म्हणाले.

अधिक वाचा  हनी ट्रॅप प्रकरणात बड्या उद्योगपतींला कोट्यवधी रुपयाचा चुना ; अभिनेत्याची पत्नी अटकेत

भाजपच्या मोर्चावर आता दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”जमावबंदी असताना तुम्ही जर मोर्चे काढत असाल तर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल” असा इशारा गृहमंत्र्यांनी भाजपला दिला आहे. तसेच हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून अहवाल आल्यानंतर यामध्ये कोण सहभागी आहे याबाबत खरी माहिती मिळेल, असंही गृहमंत्री म्हणाले. तसेच नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.

शौर्य गाजविणाऱ्या जवानांना बक्षिसे –

गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवर गस्त घालत असताना काही नक्षलवादी त्या भागात असल्याचा सुगावा लागला. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. तसेच चार जवान जखमी झाले. आज मी गडचिरोलीला भेट दिली असून जवानांचं अभिनंदन केलं. याशिवाय आज जखमी जवानांची देखील भेट घेतली. त्यांची प्रकृती उत्तम आहे. लवकरच ते रुजू होतील. शौर्य गाजविणाऱ्या जवानांना सरकारी नियमानुसार बक्षिसे देण्यात येईल, अधिक बक्षीस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.