पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं आहे. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होता.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होतं. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी नाट्यलेखन आणि जाणता राजा नाटकाचे दिग्दर्शन केले. 2015 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल २७ वर्षांत १२५० हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

अधिक वाचा  फेसबुक, गूगलचा जाहिरात महसूल सर्वाधिक; भारतीय माध्यमांपेक्षा १५ हजार कोटी रुपये अधिक

असा अलौकिक शिवअराधक होणे नाही – मुख्यमंत्री ठाकरे

!!!!! शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले….. !!!

काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले.

जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील.

शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

”कधीही न भरुन येणारी पोकळी…”, पंतप्रधान

आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं की, पुरंदरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या कार्यातून ते जीवंत असतील. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मोदींना या ट्विट सोबत आणखी एक ट्विट केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. – पंतप्रधान मोदी-

शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी शब्दांच्या पलीकडे दुखत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील.