अमरावतीः देशाचे सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, असे खोचक वक्तव्य रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते अमरावतीमध्ये बोलत होते. आपल्या तिरकस शब्दांत बोचरी टीका केली.

ते म्हणाले, आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत. त्यामुळेच सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बराच वेळा या संस्थेला भेट दिली आहे. आता अमित शहा हे सहकार मंत्री आहे. त्यामुळे ते वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही. वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. या दौऱ्यात शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

अधिक वाचा  दुसऱ्या मात्रेकडे १ कोटीची पाठ; ५ जिल्ह्यामध्येच बहुतांश लसीकरण

26 नोव्हेंबर रोजी शहांचा दौरा

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सहकार मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेस भेट देणार आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सहकार खाते स्थापन झाले. त्यानंतर पहिले सहकार मंत्री म्हणून शहा यांच्याकडे जबाबदारी आली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार चळवळीचा जोर आहे. स्वतः शहा यांनी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. आता ते महाराष्ट्रातील दौऱ्यात सहकार क्षेत्राची माहिती घेणार आहेत. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आज हे वक्तव्य केले.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. या दौऱ्यात शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही.

– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप