T20 World Cup : बहुचर्चित असा टी20 विश्वचषक 2021 अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. ऑस्ट्रेलियाची बोलिंग आजच्या सामन्यात कुठेतरी कमकुवत वाटली होती. पण फलंदाजीने ही कसर भरुन काढत ऑस्ट्रेलियाने एक मोठा आणि महत्त्वाचा विजय मिळवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषक जिंकला आहे.

केनची एकाकी झुंज

सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजी निवडली. जो निर्णय़ ऑसीसच्या गोलंदाजांनी अगदी बरोबर असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या गप्टीलने धिम्यागतीने धावा करत 28 रन केले. पण केनने संपूर्ण डाव सांभाळत 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे न्यूझीलंड 172 धावा करु शकला.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

मार्श-वॉर्नर जोडीची कमाल

न्यूझीलंडने ठेवलेलं 173 धावांच आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने तसं सहजच पार केलं. पण कर्णधार फिंच 5 धावा बाद करुन झाल्यावर यावेळी खऱ्या अर्थाने अनुभवी वॉर्नरने मार्श सोबत डाव सांभाळला. वॉर्नर आणि मार्शने केवळ 35 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 82 रन केले. आय़पीएलमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या वॉर्नरने अंतिम सामन्यात मात्र अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने नेलं. सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर सर्वाधिक धावा मिशेल मार्शने केल्या. त्याने 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय वॉर्नर बाद झाल्यावर खेळायला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 28 धावा करत संघाचा विजय पक्का केला. न्यूझीलंडकडून केवळ बोल्टने 2 विकेट घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.