मुंबई : सध्या सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह राज ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर उभयतांमध्ये चर्चा झाली. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते. संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा कर्मचाऱ्यांनी तोडग्यासाठी काही उपाय सूचविले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची भेट घेणे शक्य नाही. यामुळेच शरद पवार यांची भेट घेतल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

अधिक वाचा  करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींची बैठक

विविध सरकारी मंडळे किंवा उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन यापूर्वीच लागू झाला आहे. याच धर्तीवर एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. एस.टी. कर्मचाऱ्यांची सेवा सरकारी सेवेत विलीनीकरणाची मागणी असली तरी हा निर्णय घेण्यास कालावधी लागू शकतो. त्यापेक्षा सातवा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल, अशी भूमिका मनेसेने मांडली.

एस.टी. सेवेची सद्यस्थिती आणि ही सेवा सुधारण्यासाठी कोणते उपाय योजता येतील यावर पवार आणि ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळू नये म्हणून मनसेने पुढाकार घेतला असून, त्याचाच भाग म्हणून शरद पवार यांची भेट घेतल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.