सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सध्या तरी कागदावर दिसत आहे. आटपाडीमध्ये मतदार पळवापळवीवरून झालेल्या आघाडीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेला संघर्ष ताजा असतानाच अर्ज माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत पालकमंत्री जयंत पाटील यांची अविरोध निवडणूक करण्याचे झालेले प्रयत्न पाहता हा सामना खराच अटीतटीचा होणार की एकमेकांना सांभाळून लढत होणार हे निकालावरून स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेत राजकारण नको असे सांगत उभय बाजूंनी एकमेकाला सोयीस्कर उमेदवार देण्याचा प्रयत्न निदान दिला असल्याचे यादीवरून स्पष्टपणे दिसत आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागासाठी निवडणूक होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पहिल्यापासून भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगत होते. मात्र, भाजप नेत्यांचा पूर्वांपार राष्ट्रवादीशी असलेला घरोबा पाहता हे दबावाचे राजकारण असल्याचे कालपरवा राजकारणात आलेल्यांनाही कळत होते. मात्र, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात भाजपची पर्यायाने देशमुख गटाची ताकद वाढणे आपल्या भविष्याच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल याची जाणीव झाल्याने राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भाजपशी संगत नको अशी ठाम भूमिका घेतली होती. यामुळे भाजपमधील आप्तस्वकियांना बंँकेत पायघड्या घालण्याच्या पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाना चाप बसला.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीतील सहभागी प्रत्येक पक्षाचे एक संचालक अविरोध निवडले गेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि डॉ. विश्वजित कदम यांचे मेहुणे महेंद्र लाड यांचा समावेश आहे. तर आ. मोहनराव कदम, आ. विक्रम सावंत, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख या दिग्गजांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अविरोध निवडले गेलेले आ. नाईक यांना हे विद्यमान संचालक आहेत. त्यांना अध्यक्षपदाची संधी मागील वेळेच देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र पालकमंत्री पाटील यांनी अध्यक्षपदाची संधी दिलेले दिलीप पाटील यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिल्याने आ. नाईक यांची संधी हुकली. यावेळी मात्र ते अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असतील यात शंका नाही.

अधिक वाचा  काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर; ममतांसह विरोधकांना हा सल्ला

मतदार संख्या अवघी अडीच हजार असल्याने चुरस ही राहणारच यात शंका नसली तरी ही चुरस तालुकानिहाय दिसणार आहे. विशेत:हा आटपाडी तालुका अ वर्ग गटामध्ये तीव्र चुरस दिसणार आहे. तर मजूर संस्था गटातून भाजप प्रणीत आघाडीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख आणि महाविकास आघाडी प्रणीत आघाडीचे हणमंतराव देशमुख आणि सुनील ताटे यांच्यात राहील. या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार सोयीस्कर दिले आहेत का अशी शंका घेण्यास बराच वाव आहे.

जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीतही अध्यक्ष आपल्याच पक्षाला मिळावा यासाठी उमेदवार यादी निश्चित करीत असताना राष्ट्रवादीचे प्रयत्न दिसत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा एकदा बँकेवर ताबा कायम राखण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. सहकारात राजकारण नको असे गोंडस स्पष्टीकरण पुढे करीत भाजपमधील मित्रांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने भाजपला पॅनेलमध्ये सहभागी करून घेण्यास तीव्र विरोध केला असल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली असली तरी पडद्यामागील डावपेच वेगळेच सांगत आहेत.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक भाजपचे खा. संजय पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. दोनच दिवसापूर्वी त्यांचे वडील आर. के. तात्या पाटील यांचे निधन झाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे सांगितले जात असले तरी ते कारण पटणारे नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नाही.

अडीच हजार मतदार

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादीचे ९, काँग्रेसचे ५ , शिवसेनेचे १ आणि भाजपचे ६ सदस्य आहेत. महाविकास आघाडीचे जागा झालेल्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ७ तर शिवसेनेच ३ उमेदवार आहेत. या पैकी तीन जागा अविरोध निवडल्या गेल्या असून उर्वरित १८ जागावर महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेल आणि भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेल अशी लढत होत आहे. अडीच हजार मतदार आहेत.