उपांत्य फेरीच्या या सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. किवींचे दोन प्रमुख फलंदाज अवघ्या १३ धावांवर माघारी परतले, त्यानंतर १६व्या षटकांपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. पण, जिमि निशॅमनं १७व्या षटकात ख्रिस जॉर्डनला २६ धावा चोपल्या आणि दडपड कमी केलं. १८व्या षटकात विजयासाठी २० धावा हव्या असताना निशॅम झेलबाद झाला अन् इंग्लंडचे चाहते खूश झाले. पण, अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरील मिचेलनं सामना संपवला.

केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेसन रॉयच्या जागी इंग्लंडनं आज सॅम बिलिंगला संधी दिली, परंतु सलामीला जॉनी बेअरस्टो व जॉस बटलर ही जोडी आली. किवी कर्णधार विलियम्सनच्या अफलातून कॅचनं ही जोडी तोडली. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं किवींना पहिले यश मिळवून दिले, विलियम्सननं मिड ऑफला बेअरस्टोचा (१३) कॅच घेतला. मिल्नेनं धक्का दिल्यानंतर इश सोढीनं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर जॉस बटलरला पायचीत केलं. डेविड मलाननं ३० चेंडूंत ४१ धावा कुटल्या. मोईन अलीनं फटकेबाजीला करतानाला मलानसह तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. अली व लिएम लिव्हिंगस्टोननं धावांचा वेग वाढवताना चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४० धावा कुटल्या. अलीनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अली ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ४ बाद १६६ धावा केल्या.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा मार्टीन गुप्तील ( ४) व कर्णधार केन ( ५) यांना अवघ्या १३व्या धावांवर ख्रिस वोक्सनं माघारी पाठवले. त्यामुळे किवीचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. ख्रिस जॉर्डन व आदील राशीद यांनी पहिल्या १० षटकांत चांगली गोलंदाजी केली. डॅरील मिचेल व डेव्हॉन कॉनवे यांनी संयमी सुरुवातीनंतर किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा धावांचा वेग अपेक्षित वेगाप्रमाणे कमी होता. त्यामुळे किवींवर दडपण वाढत होते. १४व्या षटकात लिएम लिव्हिंगस्टननं स्वतःच्याच गोलंदाजीवर कॉनवेचा झेल सोडला, परंतु पुढच्या चेंडूवर त्याला यष्टीचीत करण्यात यश मिळवले. कॉनवे ३८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. किवींना ३८ चेंडूंत ७२ धावा बनवायच्या होत्या. मिचेल व कॉनवे यांनी तिसऱ्या विकेसाठी ८२ धावा जोडल्या.

अधिक वाचा  अमोल कोल्हे ट्रोल, पुणे प्रशासनावर केली टीका

लिव्हिंगस्टननं आज कमाल केली. सामन्यातील त्याच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं ग्लेन फिलिप्सला ( २) माघारी जाण्यास भाग पाडले. चेंडू व धावा यांच्यातलं वाढलेलं अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात फिलिप्सनं चेंडू टोलवला, पण तो सॅम बिलिंगनं टीपला. लिव्हिंगस्टननं टाकलेलं १६वं षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. त्यानं चार षटकांत २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. किवींना २४ चेंडूंत ५७ धावा करायच्या होत्या आणि आता त्यांना चमत्कारच वाचवू शकत होता. तो जिमि निशॅमकडून अपेक्षित होता आणि ख्रिस जॉर्डननं टाकलेल्या १७व्या षटकात त्यानं फटकेबाजी केली. चौथ्या चेंडूवर निशॅमनं टोलावलेला चेंडू सीमारेषेवर जॉनी बेअरस्टोनं टिपला अन् तोल जाण्यापूर्वी तो सहकारी खेळाडूकडे फेकला. पण, चेंडू हातातून सोडण्याआधी त्याचा पाय सीमारेषेला टेकला व किवींना ६ धावा मिळाल्या. निशॅमनं त्या षटकात २६ धावा जोडल्या आणि स्पर्धेतील इंग्लंडकडून पडलेलं हे सर्वात महागडं षटक ठरलं.

अधिक वाचा  ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका, कसे पडले नाव जाणून घ्या.

निशॅमनं पुढील षटकातही फटकेबाजी कायम राखली. आदिल राशिदच्या १८व्या षटकात दोन षटकार पडले, परंतु निशॅम बाद झाला. त्यानं १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावा चोपून त्याची कामगिरी चोख बजावली. आता किवींना १२ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. मिचेलनं अर्धशतक पूर्ण केलं. मिचेलनं १९व्या षटकात वोक्सला खेचलेला षटकात नयनरम्य होता. पुढील चेंडूवरही खणखणीत षटकार पडला. न्यूझीलंडनं ५ विकेट व १ षटक राखून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मिचेल ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. किवी प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहेत.