‘माझी तब्येत उत्तम असून दोन दिवसांत काही उपचार घेऊन महाराष्ट्र सेवेत पुन्हा रुजू होईन, चिंता नसावी’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मानदुखीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाले.

एका पत्राद्वारे  जनतेशी संवाद …..

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातील विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता. साहजिकच मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथे राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी सर्वांनी लसीचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केली आहे.