बर्मिंगहॅम – शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसुफझाई अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मलालाने बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात निकाह केला. त्यानंतर आपल्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने ही माहिती दिली. बर्मिंगहॅममध्ये माझ्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये मी लग्न केले असून भविष्यातील वाटचालीसाठी उत्सुक असल्याचे तीने म्हटले आहे.

लग्नानंतर ट्विट करत मलालाने ही माहीती दिली आहे. तीने आपल्या लग्न सोहळ्याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी खास होता. आज मी लग्नबंधनात अडकले. बर्मिंगहॅममध्ये एका छोट्याशा कार्यक्रमात मी निकाह केला, यावेळी माझ्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही उत्साही आहोत, आमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज असल्याचे ट्विट मलालाने केले आहे. तीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा पती असर, तिचे आई-वडील, झियाउद्दीन युसुफझाई आणि तूर पेकाई युसुफझाई दिसत आहेत. दरम्यान तीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाले असून, जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  26/ 11 च्या शहीद शूरवीरांना 180 रक्तदानाचे अभिवादन

कोण आहे मलाला?

मलाला युसूफझाईचा जन्म 12 जुलै 1997 मध्ये झाला, ती एक पाकिस्तानी विद्यार्थीनी आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबानने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरोधात मलालाने लढा दिला. तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांची चाललेली पायमल्ली तिने जगासमोर आणली. मलालाच्या कार्याची दखल घेऊन तीला 2014 मध्ये शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेती

9ऑक्टोबर 2012 रोजी शाळेत जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी मलालावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीला तीन गोळ्या लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तीच्यावर इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये उपचार करण्यात आले. मलालावरील या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. या हल्ल्यातून बचावलेल्या मलालाने आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला. तिच्या कार्याची दखल घेऊन 10 ऑक्टोबर 2014 रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आतापर्यंतची सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे.