मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी ऑर्थर रोड किंवा इतर तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आत पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. अनिल देशमुख यांच्या वकिलांनीही जामीन का मिळावा याबाबतचा युक्तिवाद केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून देशमुख यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता देशमुख हे ईडीच्या कोठडीत न राहता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे. त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवणार की इतर तुरुंगात पाठवणार हे अद्याप समजू शकले नाही.

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

जामिनासाठी अर्ज करणार?

देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांचे वकील आज किंवा उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. देशमुख यांना जामीन मिळण्यासाठी त्यांच्या आरोग्याचं कारण आणि सर्वोच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवालाही दिला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.

अधिक वाचा  Bipin Rawat: जागतिक स्तरावर शोककळा, शूर योद्धाला विविध देशांचीही श्रद्धांजली

सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचं म्हटलंय.