मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार केला. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला हवं, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली.

समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी, NCB ऑफिसबाहेर शक्तीप्रदर्शन

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आपल्या समर्थकांसह मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयासमोर दाखल झाले. थोड्याच वेळात समीर वानखेडे ऑफिसमध्ये आले. यावेळी ऑफिसच्या समोरच वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच शिवप्रतिष्ठाकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वानखेडेंना यावेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यादरम्यान, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

नवाब मलिक यांच्यावर कारवाई करा

“आज आम्ही वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे उभे राहिलो आहोत, जे अमली पदार्थांचं रॅकेट उध्वस्त करु पाहत आहेत. पण महाराष्ट्रात काही वृत्ती अशा आहेत ज्या वानखेडेंविरोधात आहेत. मी मंत्री नवाब मलिक यांचा निषेध करतो तसंच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतो”, असं नितीन चौगुले म्हणाले.

आमची संघटना राष्ट्रहितार्थ काम करणारी संघटना आहे. राष्ट्राच्या हितासाठी जे जे कुणी काम करत असतील त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका ते मांडतील, असं नितीन चौगुले म्हणाले.