पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहेत. चौकशीनंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीला माफी नाही, असं देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले.

मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीवेळी ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज अगदी सकाळी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना चुकीला माफी नाही, असं म्हटलं.

अधिक वाचा  राहुल भेटीनंतर राऊत म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तरी” काँग्रेसशिवाय एकजुट नाही,

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

कुणाचाही कार्यकर्ता असु दे. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचंय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’

अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नाही, 12 वाजता अटकेची कारवाई

अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री 12 पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  IND vs NZ: भारतीय संघाचा मुंबई कसोटीत विजयी डंका

ईडीची अटक चुकीची; आम्ही न्यायालयात जाणार, देशमुखांच्या वकिलाची प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांच्यावर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. आज सकाळी 11 च्या आसपास त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. ईडी अनिल देशमुख यांच्यासाठी पोलिस कोठडी मागेल तर ही अटक कशी चुकीची आहे, हे सांगण्याचा अनिल देशमुख यांचे वकील प्रयत्न करतील. निल देशमुख यांच्या अटकेनंतर त्यांचे वकील इंद्रपाल सिंह मध्यरात्री ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अनिल देशमुख यांची अटक चुकीची आहे. आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

यानंतर एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली.