नाशिकः ओबीसी आंदोलनाची धार टोकदार करून राज्यभर राळ उडवून देणारे पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे सोमवारी नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. विशेष म्हणजे हा योगायोग जुळवून आणलाय महापालिकेतील स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांना नेहमी खिंडीत गाठणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी. त्यामुळे या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरूय.

पालकमंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षणबाबतची भूमिका सर्वांनाच माहित आहे. राज्यच नव्हे, तर देशाभर त्यांनी ओबीसी तितुका मेळवावा, अशी भूमिका घेत अनेक मेळावे आणि सभा घेतल्या. राज्यातही गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न डोके वर काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बेडे ओबेसी नेते छगन भुजबळ आणि भाजपमधल्या पहिल्या फळीतल्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात, काय बोलतात याकडे आत्तापासूनच लक्ष आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री जयकुमार रावल सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नामको बँकेच्या कार्यक्रमात भुजबळ-पकंजा एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

अधिक वाचा  कमी गुंतवणूकीमध्ये दरमहिना 60 हजार रुपये कमवा, SBI चा धमाका

आमदार फरांदे यांचा पुढाकार

नाशिकमध्ये सोमवारी संदर्भसेवा रुग्णालयातील विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यांनीच भुजबळ आणि पंकजा यांना जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर आणले आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात आहे. त्यापूर्वी आमदार फरांदे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांना अनेकदा कोंडीत पकडले आहे. विशेषतः शहरातील रस्त्यावरी खड्डे बुजविण्याचे प्रकरण असो की, डेंग्यू प्रश्न. त्या नेहमीच भाजपला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करतात.

फरांदे यांचा ‘लेटर बॉम्ब’

आमदार देवयानी फरांदे यांनी काही दिवसांपूर्वी एक ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती फरांदेंनी सत्ताधारी भाजपला केली. आमदार फरांदे यांच्या ‘घरच्या आहेरा’मुळे नाशिकचे महापौर अडचणीत आले होते. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपातील ही अस्वस्थता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील औषध फवारणीबाबत देखील आमदार फरांदे यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे महापौरांबद्दल आमदार देवयानी फरांदे यांची नाराजी उघड आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याची कार्यक्रमाआधीच मोठी चर्चा आहे.