मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवला जाऊ शकतो. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अहवालानुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असू शकते. या हायप्रोफाईल प्रकरणात मोठा कट आणि देशाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमिततेचे अनेक आरोप झाले आहेत.

सूत्रांनी सांगितलं की, एनआयएचे पथक मुंबई एनसीबीच्या झोन कार्यालयात आले होते आणि त्यांनी येथे सुमारे दोन तास घालवले. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकण्यात आले. मात्र या प्रकरणाच्या तपासात वानखेडे यांच्यावरच अनेक आरोप होत आहेत. या खटल्यातील साक्षीदार प्रभाकर साईलने वानखेडे यांनी खटला मिटवण्यासाठी २५ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तो स्वतः अंडरग्राऊंड झाला आहे. समीर वानखेडे यांच्यावर मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात वसुली केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरीही रंगल्या आहेत.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची अधिसूचनाही लवकरच जारी केली जाऊ शकते, असे सूत्राने सांगितले. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास एनसीबी आक्षेप घेऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीला असं वाटतं की एनआयएच्या हस्तक्षेपामुळे भविष्यातील इतर तपासांमध्ये त्यांचे अधिकार आणि विश्वासार्हता कमी होईल. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “त्यांना आतापर्यंतच्या तपासात कोणताही दहशतवादी अँगल सापडलेला नाही.”