नवी दिल्ली : केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन धन योजना लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत PMJDY अंतर्गत बँक खात्यांची संख्या 44 कोटी झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी लाँच करण्यात आली. लोकांना बँका, कर्ज, विमा, पेन्शन यासारख्या वित्तीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

जन धन खाते उघडताना कोणतीही रक्कम जमा करावी लागत नाही. खाते उघडण्यासोबतच ग्राहकाला RuPay डेबिट कार्डदेखील दिले जाते, ज्यात अनेक सुविधा आहेत. डेबिट कार्ड, लाईफ इन्शुरन्स, कार्ड चोरीला गेल्यास किंवा व्यवहारात फसवणूक झाल्यास सरकार त्यावर संरक्षण हमी मिळते.

अशाप्रकारे सुरू करा जनधन खातं

तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.