मुंबई : कॅडेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणाची चौकशी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हेच करतील, असं स्पष्टीकरण एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलं आहे. त्यांच्याविरोधात जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून तपास हटवण्यात येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, एनसीबीचा पंच प्रभाकर साईल यानं एका प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपातील कागद सोशल मीडियात पोस्ट केला होता. या व्हायरल कागदपत्राबाबत चौकशीसाठी एनसीबीनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. यासाठी आज पाच सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली. आज सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी चौकशी पथकापुढे अनेक तथ्य मांडले. गरज पडल्यास त्यांच्याकडे आणखी पुरावे आणि कागदपत्रे मागवण्यात येतील. पण जोपर्यंत त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत तेच क्रूझवरील ड्रग्ज केसचा तपास करतील” मुंबई पोलीस जबाबदार पोलीस आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबाबत टिपण्णी करणार नाही. त्यांनी देखील आम्हाला तपासाला सहकार्य करावं.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

या प्रकरणाची आम्ही निष्पक्ष चौकशी करत आहोत. प्रमुख पंचांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली असून त्यांनीही चौकशीसाठी हजर रहावं पण त्यांचा संपर्क होत नाहीए. या प्रकरणाशी संबंधीत अनेक कागदपत्रे आम्ही ताब्यात घेतली आहेत. केपी गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांना आम्ही दोन दिवसांची मुदत देत आहोत. यांपैकी एकाच्या घराचा पत्ता आमच्याकडे होता पण त्याचं घर बंद होतं. आम्ही मीडियामार्फत त्यांना विनंती करतो की केपी गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी समोर येऊन आमच्याशी बोलावे आणि चौकशीला सामोरे जावे. त्यांनी CRPFच्या वांद्रे येथील कार्यालयात यावे. व्यवस्थित चौकशी व्हावी म्हणून आम्ही वेगळे कार्यालय निवडले आहे, असंही यावेळी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.