मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना आणि मर्यादित कालावधीचे कारण देत अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात तरी नव्या अध्यक्षाची निवड होईल, अशी चर्चा होती.

मात्र, महाविकासआघाडीला आमदार फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधानपरिषदेत पारित झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. मात्र, यामध्ये विरोधक कितपत सहकार्य करणार, हे पाहावे लागेल. अन्यथा यंदाचे हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण, ही चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

आमदारांच्या PA ला प्रवेश नाही, प्रेक्षकांना नो एन्ट्री

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात आली आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.

डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य

याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली.

एक आसन सोडून सदस्यांना बसणं अनिवार्य, प्रेक्षकांना नो एन्ट्री

अधिक वाचा  जॅकलीन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात झाली हजर

कोरोना पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी प्रेक्षकांना कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.