पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अद्याप सुरू झालेले नसले तरी एक गाव दोन प्रभागात विभागता येणार नाही. संपूर्ण गाव एकाच प्रभागात असेल याच पद्धतीने प्रभाग रचना करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला देण्यात आली आहेत.

त्यामुळे समाविष्ट गावांमधून निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांना एकगठ्ठा मतांची आखणी करणे शक्य होणार आहे.

पुणे महापालिकेची मुदत संपत आल्याने फेब्रुवारी- मार्च २०२२ मध्ये निवडणुका होणे अपेक्षीत आहे. त्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय प्रभागाऐवजी ३ सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. निवडणूक आयोगाने १६६ नगरसेवकांची संख्या निश्‍चीत केली आहे. यामध्ये ५४ प्रभाग हे ३ सदस्यांचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहेत.

अधिक वाचा  Omicronच्या प्रचंड धास्तीत; WHO कडून माहिती

शहरात मतदानासाठी ३५ लाख ५६ हजार८२४ इतकी लोकसंख्या विचारात घेतली जाणार असून, समाविष्ट गावात सुमारे चार लाख लोक संख्या आहे. समाविष्ट गावांमधून जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर या गावांमधून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पण अद्याप प्रभाग रचना जाहीर झालेली नसल्याने नेमका प्रभाग कसा असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभाग रचना कशी आहे यावरून निवडणूक लढवायची किंवा नाही हे अनेक इच्छुकांचे ठरणार आहे.

तीनचा प्रभाग करताना किमान ६१ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना करताना नदी, नाले, रस्ते, उड्डाणपूल यासह इतर नैसर्गिक सीमा तोडू नयेत असे आदेश यापूर्वीच निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे समाविष्ट गावांमध्ये प्रभाग रचना करताना एक गाव दोन प्रभागात विभागता येणार नाही, एक गाव एकाच प्रभागात आले पाहिजे. जर विभागणी न केल्याने प्रभागाची मतदारसंख्या जास्त होत असेल तर अशा वेळी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून विभागणीसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे, तसेच बैठकीमध्ये याबाबत तोंडी आदेश दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

सोईनुसार गावे तोडण्याची चर्चा

एकीकडे एक गाव दोन प्रभागात विभागता येणार नाही असे आदेश आयोगाकडून देण्यात आले असले तरी सध्या समाविष्ट गावांची आपल्या सोईनुसार प्रभागात विभागणी करण्यासाठी इच्छुक व नेत्यांची फिल्डींग लावल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रभाग रचनेत काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

प्रभाग रचनेसाठी हे नियम महत्त्वाचे

– प्रभाग रचना करताना शक्यतो प्रगणक गट तोडू नये

– रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या नैसर्गिक मर्यादा लक्षात घ्याव्यात.

– एका इमारतीचे, एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

– प्रभाग रचनेत रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे याच्या नंबरचा उल्लेख असावा