दुबई : ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची हवा निघाली, त्याच खेळपट्टीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सहजपणे फटकेबाजी करत टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाला विजयी सुरुवात करून दिली. यासह पाकिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत भारताला नमवताना १० गड्यांनी बाजी मारली. भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावांत रोखल्यानंतर पाकिस्तानने १७.५ षटकांत एकही बळी न गमावता विजयी लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आपले इरादे स्पष्ट केले. मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने ५२ चेंडूंत नाबाद ६८ धावा फटकावताना ६ चौकार व २ षटकार मारले. दोघांनी नाबाद १५२ धावांची तडाखेबंद सलामी देत भारतीयांचे मानसिक खच्चीकरण केले. भारताचा एकही गोलंदाज पाक फलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

त्याआधी, पाकिस्तानने भेदक मारा करत भारतीयांची कोंडी केली. मात्र, त्यांना एकटा भिडला तो कर्णधार विराट कोहली. एकापाठोपाठ एक खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर कोहलीने खंबीरपणे खेळत ४९ चेंडूंत ५ चौकर व एका षटकारांसह ५७ धावा केल्याने भारताचा डाव सावरला. वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने पहिल्याच षटकात रोहित शर्माला पायचीत पकडल्यानंतर तिसऱ्याच षटकात लोकेश राहुललाही बाद केले.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्याचा धक्का पचवत असतानाच भारतीयांना सूर्यकुमार यादवच्या (११) रुपाने तिसरा धक्का बसला. येथून कोहलीने ॠषभ पंतला हाताशी घेत भारताचा डाव उभारला. पंतनेही त्याला चांगली साथ देत चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली. पंतने ३० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३९ धावा केल्या. पंत शादाब खानचा शिकार ठरला. एका बाजू लावून धरलेल्या कोहलीने संघाला समाधानकारक मजल मारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अफ्रिदीने ३१ धावांत ३ बळी घेत भारतीयांना कमालीचे दडपणात ठेवले.

राहुल नो बॉलवर बाद?

सलामीवीर राहुल नो बॉलवर बाद झाल्याचा दावा भारतीय चाहत्यांकडून झाला. राहुल बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर शाहीनचा चेंडू नो बॉल असल्याचे व्हायरल झाले. याकडे पंचांचेही लक्ष गेले नाही. शिवाय काही कळेपर्यंत राहुलने मैदानही सोडल्याने यावर रिव्ह्यूही घेता आला नाही. यामुळे सोशल मीडियावर पंचांच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

कोहलीचा दणका!

– विराट कोहलीने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध गेल्या चार डावांत तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावले.

– याआधी त्याने २०१२ मध्ये कोलंबोला नाबाद ७८, २०१४ मध्ये ढाका येथे नाबाद ३६, २०१६ साली कोलकाता येथे नाबाद ५५, तर आता दुबईत कोहलीने ५७ धावांची खेळी केली.

रोहित शर्माचा ‘गोल्डन डक’

पहिल्याच षटकात शाहिन अफ्रिदीने भारताला मोठा धक्का देताना रोहित शर्माला पायचीत पकडले.

शाहिनचा चेंडू समजण्यापूर्वीच रोहितविरुद्ध जोरदार अपील झाले आणि पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला.

२०१६ सालानंतर पहिल्यांदाच रोहित टी-२० सामन्यात गोल्डन डकवर (पहिल्याच चेंडूवर बाद) बाद झाला.

याआधी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित गोल्डन डकवर बाद झाला होता. टी-२० विश्वचषक स्पर्धेत गोल्डन डकवर बाद होणारा रोहित पाचवा भारतीय ठरला.

नो बॉलचा निर्णय बदलला!

हसन अलीच्या सहाव्या षटकात कोहलीने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. मैदानी पंचांनी हा चेंडू ‘नो बॉल’ ठरवला. पण पंचही या निर्णयाबाबत गोंधळले आणि त्यानंतर आपला निर्णय मागे घेतला. यामुळे हसन अलीही गोंधळला आणि पुढील चेंडू फ्री हीट आहे की नाही, याबाबत शंका विचारु लागला. पंचांच्या या भूमिकेवर मात्र कोहली नाराज झाला. यानंतर चौथ्या चेंडूवर यादव बाद झाला.

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

धावफलक

भारत : लोकेश राहुल त्रि. गो. अफ्रिदी ३, रोहित शर्मा पायचीत गो. अफ्रिदी ०, विराट कोहली झे. रिझवान गो. अफ्रिदी ५७, सूर्यकुमार यादव झे. रिझवान गो. हसन ११, ॠषभ पंत झे. व गो. शादाब ३९, रवींद्र जडेजा झे. नवाझ गो. हसन १३, हार्दिक पांड्या झे. बाबर गो. रॉफ ११, भुवनेश्वर कुमार नाबाद ५, मोहम्मद शमी नाबाद०. अवांतर – १२. एकूण : २० षटकांत ७ बाद १५१ धावा.

बाद क्रम : १-१, २-६, ३-३१, ४-८४, ५-१२५.

गोलंदाज : शाहिन अफ्रिदी ४-०-३१-३; इमाद वासिम २-०-१०-०; हसन अली ४-०-४४-२; शादाब खान ४-०-२२-२; मोहम्मद हाफिझ २-०-१२-०; हॅरिस रॉफ ४-०-२५-१.

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान नाबाद ७८, बाबर आझम नाबाद ६८ अवांतर – ६.
एकूण : १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा.

गोलंदाज : भुवनेश्वर कुमार ३-०-२५-०-; मोहम्मद शमी ३.५-०-४२-०; जसप्रीत बुमराह ३-०-२२-०; वरुण चक्रवर्ती ४-०-३३-०; रवींद्र जडेजा ४-०-२८-०.