महामेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे वनाझ ते रामवाडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. गेले अनेक दिवसांपासून वनाझ कंपनी जवळ स्टेशन तयार करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास वनाझ कंपनीला लागून असलेल्या खाजगी मालकीच्या रस्त्यावर मेट्रोच्या ठेकेदाराकडून कुठलीही परवानगी न घेता केबल टाकण्याकरिता अनधिकृतपणे खोदाई सुरू होती. मनसेचे उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांच्यासह दीपक कुल, नितीन आंग्रे, श्याम सुर्वे, बाबा गायकवाड, गौरव राऊत, यतिन घरत यांनी घटनास्थळी भेट देवून त्यास विरोध केला परंतु संबंधित ठेकेदाराची भाषा अरेरावीची होती. तो जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न करत होता. वनाज कंपनीची भिंत देखील फोडण्याचे काम सुरू होते. संजय काळे यांनी ठेकेदाराकडे वर्क ऑर्डर आणि खोदाईची परवानगी मागितली असता तो ती उपलब्ध करून देऊ शकला नाही.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

याउलट आम्हाला काम करताना कुणाच्या परवानगी ची गरज लागत नाही अशी उर्मट भाषा त्याच्याकडून झाली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला खोदाईचे काम बंद करावयास भाग पाडले. २३ ऑक्टोबर रोजी वनाझ परिवार, इंद्रधनु सोसायटी,स्टेट बँक नगर या तीनही सोसायटींच्या बहुसंख्य नागरिकांसोबत मनसे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे, संजय काळे यांनी मेट्रो प्रशासनाला याबाबत जाब विचारुन संबंधित ठेकेदाराला महामेट्रोने काळ्या यादीत टाकावे तर महापालिकेने मेट्रो वर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.

महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गौतम बिऱ्हाडे यांनी फोनद्वारे तर इंजिनीयर राहुल राय यांनी प्रत्यक्ष भेटून झालेल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढे सदर ठिकाणी काम करताना रीतसर परवानगी घेऊनच केले जाईल असे सांगून ठेकेदाराने खोदलेला रस्ता पूर्ववत करून दिला तर यापुढे सोसायटीच्या नागरिकांना मेट्रो कडून कुठलाही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक निवडणूक: नितीन पाटील यांची वर्णी कशी?; शिवेंद्रराजे मागे का पडले?

विकास कामांना मनसेचा विरोध नाही परंतु बळजबरी आणि दडपशाही करून नागरिकांच्या न्यायहक्कांवर कोणी गदा आणत असेल तर मनसे कडून कदापी सहन केले जाणार नाही. मेट्रो प्रशासनाकडून यापुढे या तीनही सोसायट्यांमधील रहिवाशांना जर कुठलाही त्रास झाला किंवा त्यांच्या खाजगी जागेचा गैरवापर केला तर महाराष्ट्र नवनिर्माण अशीसेना मनसे स्टाईलने महामेट्रोला धडा शिकवेल  तंबी ॲड.किशोर शिंदे आणि संजय काळे यांनी दिली. यावेळी महेश सावंत,ताटके साहेब, गोसावी साहेब, विनायक पवार, नरेंद्र मुळीक,दीपक कुल,श्याम सुर्वे, बाबा गायकवाड,मिलिंद देशपांडे,यतिन घरत यांच्यासह वनाझ,इंद्रधनु आणि स्टेट बँक नगरचे बहुसंख्य रहिवासी उपस्थित होते.