नाशिक: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे भुजबळ काँग्रेसमध्ये गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते, असा किस्सा विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांना त्याबाबत छेडले असता त्यांनीही भुजबळांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या. पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांविषयी विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवण्यात आलं आहे. असे अनेक लोकं आहेत दुर्देवी, ज्यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात गेले. पण त्यांच्या नशीबी काय आलं शेवटी? ठिक आहे. कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झाला असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असं राऊत म्हणाले.

अधिक वाचा  अवघ्या चार आणि सात वर्षाच्या चिमुकल्यांनी पार केला मलंग गड

सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत, या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून सोमय्यांना स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार पाठवला. मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे परग्रहावरून आलेत का? ते देशाचे मोठे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो, मोदी पवारांना गुरु मानतात.

मोदींनी जाहीरपणे सांगितलं आहे. मोदी म्हणले पवारांचं बोटं धरून मी राजकारणात आलो आहे. एका अर्थाने सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत, असंच म्हणावे लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. परमबीर सिंगाला कोणी पळवलं देशातून? केंद्राच्या परवानगीशिवाय एखादा अधिकारी पळून जाऊ शकतो का? सोमय्यांना एवढं जर माहीत नसेल तर हिमालयात जाऊन बसा म्हणावं, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

भुजबळ काय म्हणाले होते?

16 ऑक्टोबर रोजी छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब म्हणायचे, तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते खंत नाही. मला बरोबर माहीत आहे मी काय बोललो ते. बाळासाहेबच म्हणायचे भुजबळ गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. मी त्यावेळी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. त्यावेळी मी शिवसेना-भाजप सरकारवर तुटून पडलो होतो.

तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. काही केसेसही टाकल्या होत्या. त्यात काही खरं नव्हतं. त्यावेळी मी निधड्या छातीने लढत होतो. त्यावेळी काँग्रेसचं विभाजन झालं नव्हतं. तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं तुमचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असणार तेव्हा पवार म्हणाले, आणखी कोण असणार भुजबळच असणार, असं भुजबळांनी सांगितलं होतं.