मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना एनसीबीने अटक केलीय. कोर्टानं आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या प्रकरणावरुन एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्यन खानच्या अटकेवरुन भाजपवर गंभीर आरोप केलाय. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

एनसीबी ज्या प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरुन निश्चितपणे दाल मे कुछ काला है. एका मोठ्या नायकाच्या, शाहरुखच्या मुलाच्या विरोधात हे षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांच्या या आरोपांवर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  सुप्रीम कोर्टाची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

नाना पटोले यांचा नेमका आरोप काय?

एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदू-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

अधिक वाचा  जॅकलीन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात झाली हजर

समीर वानखेडेला वर्षभरात तरुंगात टाकणार, मलिकांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना जाहीर सभेत आव्हान दिलं आहे. ‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केलाय.