दुबई: एकीकडे टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार सुरु असला तरी अनेकांचे खासकरुन भारत आणि पाकिस्ता देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष 24 ऑक्टोबर या तारखेकडे लागले आहे. सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला सामना 24 तारखेला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच आणि त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ रणनीती करण्यात व्यस्त असून नेमके अंतिम 11 खेळाडू कोण असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे.

दोन्ही सराव सामन्यात भारताने फलंदाजीने समोरच्या टीमला सळो की पळो केलं. त्यामुळे फलंदाजीचा तसा मोठा प्रश्न नाही. पण गोलंदाजीमध्येच भारतीय संघाला थोडा विचार करावा लागणार आहे. कारण टी20 सामन्यामध्ये 5 मुख्य गोलंदाज असले तरी एक अधिकचा पर्याय 6 वा गोलंदाज म्हणून लागतो. याचे कारण 5 पैकी 1 गोलंदाज खराब फॉर्ममध्ये असतोच. कधी आणखी एक गोलंदाजही खराब फॉर्ममध्ये असल्यास 6 वा गोलंदाज अनिवार्य होतो. सध्या भारत 3 वेगवान आणि 2 फिरकीपटूंचा विचार करत आहे.यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती किंवा आर आश्विन यांच्यातील एकजण असे 5 गोलंदाज असतील. त्यात भारताचा अष्टपैलू हार्दीक गोलंदाजी करत नसल्याने भारतासमोर 6 व्या गोलंदाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

विराट कोहली पर्याय?

वरील प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विराट कोहलीकडून दोन ओव्हर देखील टाकून घेतल्या. विराटने देखील केवळ 12 धावाच दिल्या. पण हा एक सराव सामना असल्याने मुख्य सामन्यात मात्र विराटला गोलंदाजी देताना आणखी विचार करणे गरजेचे आहे. विराटने मुख्य सामन्यात 2 ओव्हर टाकून त्यात कमीत कमी धावा दिल्या तरी भारतीय संघाचा हा प्रश्न सुटु शकतो.

भुवनेश्वर आणि राहुलवर टांगती तलवार

भारतीची गोलंदाजी ही पूर्वीपासून एक समस्या आहे. अलीकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज संघात असले तरी नेमका कोणता खेळाडू कधी फॉर्ममध्ये आहे? असे प्रश्न आहेतच. त्यात सध्या टी20 संघात स्थान देण्यात आलेले गोलंदाज राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे खास लयीत दिसत नाहीत. अनुभवी भुवीला स्वींग जमत नसून त्याने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात बऱ्याच धावा खालल्या. 4 षटकात 54 धावा देत त्याने एकही विकेट घेतला नाही. तर दुसरीकडे युझवेंद्र चहलच्या जागी संघात आलेल्या राहुल चाहरनेही 4 षटकात 43 धावा देत केवळ एकच विकेट घेतली. त्यामुळे या दोघांना संघात कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणं अनिवार्य आहे.